मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तसेच त्यांची प्रकृती देखील खालावली असून त्यांमी उपचार घ्यायला नकार दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, जर 15 तारखेला अधिवेशन घेतले नाही, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट घेतले नाही तर या महाराष्ट्रात काय होईल हे त्यांच्या लक्षात येणार नाही. जसे त्यांनी टप्पे पाडले आहेत तसेच आम्हीही आंदोलनाचे टप्पे पाडलेले आहेत.
सरकारला आम्ही काय दाखवू हे चांगलेच माहिती आहे. जर 15 तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, ते त्यांना लवकरच कळेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
15 तारखेला अमिच शाह संभाजीनगरला येणार आहेत. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही अमित शाह यांची भेट कशासाठी घ्यायची, उलट त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी. यापूर्वी आम्ही त्यांना खूप विनंत्या केल्या आहेत. पण त्यांनी लक्ष दिले नाही मग आता ते कोणीही असू द्या. आम्ही त्यांना परत हिंडायला लावायला खंबीर आहोत. आम्ही आता 14 राज्यात एकत्र यायला लागलो आहोत. मग आम्ही त्यांना दाखवतो कचका काय असतो ते. तसेच आता आम्ही चौदा राज्यात एकत्र येणार असून आता देशात आंदोलन होईल, असेही जरांगे म्हणाले.