लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळतेय. कारण काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविल्याचे वृत्त कळते आहे. या सर्व घडामोडींमुळे नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, दिल्लीत वरिष्ठांशी ते चर्चा करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आपला राजीनामा सोपविला आहे. त्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी माजी आमदार असा उल्लेख केलाय. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला आहे. १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कदाचित अशोक चव्हाण देखील याचवेळी भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही ५ ते ६ आमदार देखील राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये विश्वजित कदम, अस्लम शेख, जितेश अंतापूरकर व अनेक माजी आमदार अशोक चव्हाणांसोबत असल्याची चर्चा आहे.