आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदारकीचा तर नाना पटोले यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासर्व घडामोडी सुरु असताना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात काही पक्षप्रवेश पार पडले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसकडे अनेक नेते संपर्कात असल्याचे म्हणत काँग्रेसचे टेन्शन आणखी वाढवले असल्याचे दिसून येतेय.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”काँग्रेसकडे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. सध्याची काँग्रेस पक्षाची वाटचाल पाहता अनेक नेत्यांचा जीव तिथे गुदमरत आहे. जनतेशी जोडलेल्या नेत्यांचा जीव गुदमरत आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये येत आहेत. सध्या देशभरात हाच ट्रेंड आहे. काही मोठे भाजपामध्ये येतील असा मला विश्वास आहे.त्यामुळे, आगे आगे देखिये होता है क्या? , इतकेच मी तुम्हाला आज सांगेन.”
राजीनामा दिल्यानंतर आजच अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात होते. मात्र आज तसे झाले नाही. अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि भाजप प्रदेश कार्यालयात होणारे पक्षप्रवेश व फडणवीसांची पत्रकार परिषद यामुळे अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याचा चर्चा सुरु होत्या. अजूनही त्या सुरु आहेत. कदाचित १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही ५ ते ६ आमदार देखील राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये विश्वजित कदम, अस्लम शेख, जितेश अंतापूरकर व अनेक माजी आमदार अशोक चव्हाणांसोबत असल्याची चर्चा आहे.