काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या सर्व घडामोडींमुळे नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, दिल्लीत वरिष्ठांशी ते चर्चा करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असले पाहिजे असे काही नाही. मी माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंत काँग्रेसचे काम केले आहे. पण आता मला वाटते की अन्य पर्याय आपण पाहिले पाहिजेत. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
पुढे त्यांना काँग्रेसचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी मी बोललेलो नाही. कोण काय करेल याबाबत मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगतो की, काँग्रेसच्या एकाही आमदारासोबत माझे बोलणे झालेले नाही.
मी अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. मला आता कुणाबद्दलही तक्रार करायची नाही. तसेच माझ्या मनात कुणाबद्दलही व्यक्तिगत भावना नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. मला भाजपची कार्यप्रणाली अद्याप माहिती नाही. त्यामुळे मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले.