पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी देशातील विविध राज्यांमध्ये 46 ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात 1 लाखाहून अधिक तरुणांना व्हर्च्युअल पद्धतीने नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
दिल्लीत कार्मिक भवनची पायाभरणी करून आभासी पद्धतीने कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत सरकारचे रोजगार निर्मिती अभियान संपूर्ण पारदर्शकतेने राबवले जाते आहे. देशातील सर्व तरुणांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि समन्वय साधण्यास मदत होईल. युवकांनी कठोर परिश्रम आणि कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण करावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. नोकरीसाठी निश्चित केलेली भरती प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. स्टार्टअप योजनेच्या अंमलबजावणीमुळे तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असेल असे पंतप्रधानांनी सांगितले.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देशातील स्टार्टअप्सची संख्या आता 1.25 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. यापैकी मोठ्या संख्येने स्टार्टअप टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये आहेत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्सना देण्यात आलेल्या करात सूट वाढवण्याची घोषणाही करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या रोजगार मेळाव्याद्वारे भारतीय रेल्वेतही भरती केली जात आहे. भारतीय रेल्वे आज एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट होणार आहे. जेव्हा देशात कनेक्टिव्हिटी विस्तारते तेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे नवीन बाजारपेठा निर्माण होऊ लागतात आणि पर्यटनस्थळे विकसित होतात. तसेच नवीन व्यवसाय निर्माण होऊन लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतात. म्हणजे चांगल्या कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होतो असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या हस्ते आज, सोमवारी केंद्र सरकारचा महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयात एक लाखांहून अधिक तरुणांना नियुक्ती देण्यात आली.