गणेश जयंती माघ महिन्यातली शुक्ल पक्षातील चतुर्थीला येते. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे म्हटले जाते. माघ चतुर्थीला तिळाच्या लाडूचे विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. तसेच वरद चतुर्थी असेही म्हटले जाते.
गणेश जयंतीला बुद्धीचा स्वामी असणाऱ्या गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो .हा सण विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो .काही पुराणांनुसार या दिवशी महोत्कट विनायक या गणपतीच्या अवताराचा जन्म झाला असे मानले जाते .महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्म घेऊन या महोत्कट विनायकाने देवांतक व नरांतक या असुरांचा वध केला असे मानले जाते.
या दिवशी गणपतीचे पूजन केले जाते. पूजक व्यक्तीने लाल रंगाचे वस्त्र वापरावे असा संकेत आहे. गणपतीला या दिवशी तिळाचा लाडू व तिळाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे भक्त तिळ मिश्रित पाण्याने स्नान देखील करतात.
गणेश जयंतीला महाराष्ट्रातील अष्टविनायक तसेच सिद्धिविनायक व इतर गणेश मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात .
जय गणेश !
*गायत्री कदम* ,पिंपळेसौदागर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत