काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, आज अशोक चव्हाण आज रीतसरपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी आमदार अशोक चव्हाण माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ”आज मी माझ्या राजकीय आयुष्याची मी पुन्हा एकदा पुनश्च नव्याने सुरूवात करत आहे. आज मी रीतसर भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहे. तिथे मी आता निघालो आहे आणि हा कार्यक्रम दुपारी होणार आहे.”
अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभा उमेदवारी मिळणार?
अशोक चव्हाण आज भाजपामध्ये रीतसर प्रवेश करणार आहेत. दरम्यान भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने महायुतीने राज्यसभेसाठी ६ वा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.