महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. तर चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी काही आमदारही जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत. अशातच आता काँग्रेसच्या अनेक आमदारांनी चव्हाणांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या काही आमदारांनी अशोच चव्हाण यांना गुप्तपणे पाठिंबा दिला आहे. या आमदारांनी अशोक चव्हाणांना फोन करत सांगितले की, तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे. आमचे तुम्हाला समर्थन आहे. पण आत्ता आम्हाला पक्ष सोडता येणार नाही. कारण आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम्ही योग्यवेळी तुमच्यासोबत येऊ.
अशोक चव्हाण आज भाजपामध्ये रीतसर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच भाजपकडून राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने महायुतीने राज्यसभेसाठी 6 वा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.