आज अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपमध्ये आले हा आनंदाचा दिवस आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती वाढली आहे. राज्यातील एक मोठे नेतृत्त्व आमच्यासोबत आले आहे.
ज्यांनी अनेक मंत्रीपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द आपल्याला पाहता आली. ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आज भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश पुढे जात आहे. देशात विकास होत आहे. अशा भावना अनेक नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे असे अनेक नेते मुख्य धारेमध्ये येत आहेत. तसेच येत्या काळात इतरही काही नेते आहेत जे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेतही देवेंद्र फडणवीसांनी दिले.