आज मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोक चव्हाण यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. हा पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्हा आता भाजपामय होण्याची शक्यता आहे. तसेच अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत , महायुतीला भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे.
अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना नाना पटोले यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ”नाना पटोले यांना देखील आम्ही प्रवेश दिला होता की नाही? आता त्यांची सवय आहे एका ठिकाणी टिकूच शकत नाहीत ते. कोणत्या एका पदावर देखील टिकू शकत नाहीत. त्यामुळे ते सांगतात त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका.”
अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभा उमेदवारी मिळणार?
अशोक चव्हाण आज भाजपामध्ये रीतसर प्रवेश करणार आहेत. दरम्यान भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने महायुतीने राज्यसभेसाठी ६ वा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.