काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आज मी नवीन सुरूवात करत आहे. भाजपची जी ध्येयधोरणे आहेत त्यानुसार मी काम करेल. तसेच पक्ष मला जो आदेश देईल आणि फडणवीस जे काम सांगतील ते मी करणार आहे. मी काहीही मागणी केलेली नाही. मला जे काही सांगितले जाईल ते मी करणार आहे.
पुढे ते म्हणाले, काँग्रेसमधील सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला सहकार्य केले. तसेच भाजपमध्ये येण्याचा हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो आहे. आज मी जास्त बोलणार नाही. कारण मी पक्षात नवीन आहे. पण योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या सर्वांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असताना देखील राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. तसेच आता मी मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. त्यांची प्रेरणा घेऊन काम करणार आहे. आता आयुष्याची खरी सुरूवात करत आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.