पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याबाबत कायदा बनवण्यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची पूर्ण तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
2021 च्या आंदोलनाप्रमाणेच यावेळीही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात उतरले आहेत. किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा बनवण्यासह त्यांच्या अनेक मागण्या मान्य होण्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या सीमांवर सैनिकांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हरियाणा पोलिस शेतकऱ्यांवर नजर ठेवून आहेत आणि ड्रोनद्वारे त्यांच्या संख्येचा अंदाज घेत आहेत. वेळोवेळी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. आजूबाजूला धूर झाला असून आंदोलकांनी दगडफेकही केली.
तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर उड्डाणपुलावरील सुरक्षा अडथळे तोडले आहेत. सध्या हजारो आंदोलक शंभू सीमेवर उपस्थित आहेत. तसेच शंभू सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधून सिमेंटचे बॅरिकेड जबरदस्तीने हटवले आहेत.
तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.