” नमस्कार ,आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ” हे वाक्य ऐकून दिवसाची सुरुवात करणारी एक पिढी 70 ते 80 च्या दशकात सर्वांनी अनुभवली आहे. दुसरे कोणतेही मनोरंजनाचे साधन नसलेला तो काळ. रेडिओ हे एकमेव साधन होतं मनोरंजनासाठी आणि जगाच्या संपर्कासाठी सुद्धा. क्रिकेट मॅच निवडणुकीचे निकाल अशा वेळी तर शहरातील मोठ्या चौकांमध्ये आणि गावातल्या चावडीवर लोक एकत्र जमून सार्वजनिक रित्या याचा आनंद घेत होते.
गीत रामायण किंवा युद्ध जिंकल्याच्या बातम्या आल्या की प्रत्येक घरामध्ये रेडिओला हार घालून हा उत्सव साजरा व्हायचा. रेडिओचा शोध १८८५ साली लागला असला तरी भारतात रेडिओ यायला १९२३ साल उजाडलं होतं. तेव्हापासून ते टीव्ही येईपर्यंत म्हणजे १९८०च्या पुढच्या काळापर्यंत रेडियो ना प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांमुळे आज रेडिओचा महत्व कमी झालेलं असलं तरी अजूनही नित्य नेमाने रेडिओ ऐकणारा एक विशिष्ट वर्ग रेडिओ चे महत्त्व टिकवून आहे.
एफएम बँड, इनफीनिटी रेडिओ अशा माध्यमातून रेडिओने देखील आधुनिक रुप घेतले आहे . आज 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो . सार्वजनिक संपर्काचा अभाव असणाऱ्या काळात रेडिओ ने प्रत्येकाला “ऐकायची” सवय लावली. म्हणून रेडिओ हे केवळ प्रसार माध्यम नव्हतं तर आपल्याला घडवणार एक संस्कार केंद्र होतं.
*मीनल कुलकर्णी*
तळेगाव दाभाडे
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत