सर्वात वयस्कर भारतीय कसोटी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार दत्ताजी गायकवाड यांचे निधन झाले आहे. दत्ता गायकवाड हे 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.
दत्ता गायकवाड यांना डीके म्हणून ओळखले जाते. त्यांनी बडोद्याचे प्रतिनिधित्व केले होते आणि कर्णधार म्हणून त्यांनी 1957-58 हंगामात संघाला रणजी विजेतेपद मिळवून दिले होते. 2016 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी दीपक शोधन यांच्या दुःखद निधनानंतर गायकवाड हे सर्वात वयस्कर जिवंत भारतीय क्रिकेटपटू बनले. आता दत्ताजींच्या मृत्यूनंतर सी.डी. गोपीनाथ हे सर्वात जुने भारतीय क्रिकेटपटू आहेत.
डीके गायकवाड यांनी 1952 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. आपल्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, दत्ताजी यांनी 11 कसोटी सामने खेळले आणि 350 धावा केल्या. ज्यामध्ये त्यांच्या नावावर अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, दत्ताजी गायकवाड यांनी 110 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 5788 धावा केल्या ज्यात त्यांच्या नावावर 17 शतके नोंदवली गेली. दत्ता गायकवाड हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळत असत. त्यांच्या लेग स्पिन गोलंदाजीद्वारे, ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 25 विकेट घेण्यातही यशस्वी ठरले आहेत. गेल्या वर्षी, 27 ऑक्टोबर 2023 रोजी दत्ताजींनी त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, दत्ता गायकवाड हे बडोदा क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाले होते आणि त्यांनी अनेक नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले होते. त्यापैकी काहींनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
दत्ता गायकवाड यांचा मुलगा अंशुमन गायकवाडही भारताकडून खेळला आहे. अंशुमनने भारतासाठी 55 सामने खेळले आणि जून 2018 मध्ये त्याला सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.