केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. ते महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यासाठी येणार होते. पण आता त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.
अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडणार होती. त्यासाठी तयारीदेखील सुरू होती. पण आता अचानक अमित शाह यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांआधीच अमित शाह यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तसेच त्यांचा हा दौरा स्थगित होण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.
अमित शाह हे 15 फेब्रुवारीला सर्वात आधी अकोल्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार होते. या बैठकीमध्ये अमित शाह अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते.