राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यसभेतील एकूण १७ राज्यांमधील ५६ सदस्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. या दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. याआधी ही ऑफर प्रियांका गांधी यांना देण्यात आल्याचे समजते. मात्र त्यांनी यासाठी स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
सध्या सोनिया गांधी या उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी या हिमाचल प्रदेश किंवा राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्याचबरोबर प्रियांका गांधी या रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ६ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री.व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. सध्या भाजपमधील राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना पक्ष पुन्हा संधी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते.
अशोक चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी मिळणार?
अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. कदाचित भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण आधी १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल असे म्हटले जात होते. मात्र हा प्रवेश आजच झाला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना भाजपा राज्यसभेची उमेदवारी देणार का? अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे.