हलाला सर्टिफिकेट दिल्याप्रकरणी मुंबईतील हलाल कॉन्सीलच्या चौघांना उत्तरप्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एटीएस) अटक केली आहे. मौलाना मुदस्सीर, हबीब युसूफ पटेल, अन्वर खान आणि मोहम्मद ताहिर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
उत्तरप्रदेश सरकारने राज्यात हलाल-प्रमाणित उत्पादनांचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वितरणावर बंदी घातली आहे. लखनऊमध्ये हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली पैसे उकळल्याच्या आरोपाखाली काही संस्था, उत्पादन कंपन्या, त्यांचे मालक आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. यूपी एसटीएफने सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हलाल कॉन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि कोषाध्यक्ष यांना अटक केली आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊच्या हजरतगंज कोतवालीमध्ये हलाल प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एसटीएफकडे देण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हलाल कॉन्सील ऑफ इंडियाच्या वतीने हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपये घेत होते. प्रमाणपत्र देण्यासाठी, प्रति उत्पादन 1 ते 10 हजार रुपये शुल्क आकारत होते.
वस्तुंच्या प्रमाणिकरणासाठी “नॅशनल एक्रेडेशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज” (एनएबीसीबी) संस्थाना अधिकार देते. परंतु, एनएबीसीबी किंवा इतर कुठल्याही सक्षम बोर्डातर्फे हलाल कॉन्सील ऑफ इंडियाला यासाठी अधिकृत करण्यात आलेले नाही. तसेच हलाल कॉन्सीलकडे वस्तुंची तपासणी व चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा देखील नाही. तरी सुद्धा हलाल कॉन्सील केवळ हलालचा लोगो प्रमाणित करून संस्थेकडून अवैध वसुली करीत होती. निर्यात होणाऱ्या मांसाहारी पदार्थांसोबतच रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांनाही हलाल प्रमाणपत्र देण्यात आले होते. तर डिश बनविण्यावर संस्थेचे कोणतेही नियंत्रण नव्हते. मनमानी पद्धतीने पैसे घेण्याच्या उद्देशाने हलाल प्रमाणपत्र दिले जात होते. उत्तरप्रदेश एटीएसने हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या हलाल कॉन्सील ऑफ इंडियाच्या कार्यालयांची आणि सर्टिफिकेट घेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून कारवाई केली आहे. त्यानंतर मुंबईतून या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.