वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्पसजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीं चरणी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, प्रियांका गोडसे आणि ओंकार मोझर, वृषाली मोझर यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि बाल गणेशाची रुपे पुष्पसजावटीमध्ये साकारण्यात आली होती.
लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी दगडूशेठ मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.