महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट एसटी स्थानकाला अचानक भेट देऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली.
यावेळी एसटी स्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी स्वच्छतागृहात पुरेशी स्वच्छता नसल्याचे तसेच विश्रांतीगृहांमध्ये पुरेशा सोयी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. एसटी स्थानकातील स्वच्छता वाढवावी, कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याचा गिझर, थंड पाण्याचा कुलर तसेच झोपण्यासाठी व्यवस्थित बेडस उपलब्ध करून द्यावे. संपूर्ण स्थानकात स्वच्छता असावी असे निर्देश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दिले. ठाण्यातील खोपट एसटी स्थानक हे मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देशही त्यांना दिले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, एसटीचे महाव्यवस्थापक डॉ.माधव पुसेकर हे उपस्थित होते.