सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावली आहे. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. नाकातून रक्तस्त्राव होत असताना देखील मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती बिघडत चालली आहे. काल जरांगेंची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्यपथक अंतरवालीमध्ये दाखल झाले होते. पण बीपी आणि नाडी तपासण्यासाठी जरांगेंनी नकार दिला.
याबाबत वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, आमचे डॉक्टर्स दर तासातासनी मनोज जरांगेंची विचारपूस करत आहेत. तपासणी करण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी पाणी तरी घ्यायले हवे, पण त्यालाही ते नकार देत आहेत.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला असून काल रात्री जालना-जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. तसेच हिंगोलीसह लातूर आणि उस्मानाबादमध्येही आज बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, मी सगेसोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगेनी ठामपणे स्पष्ट केले आहे.