राज्यात मोठे राजकीय भूकंप होताना दिसत आहेत. काल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान मोदी बागेत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत.
शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी भाष्य केले आहे. आज शरद पवार बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवरचा आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे मंगलदास बांदल म्हणाले.
दरम्यान, आता शरद पवार गट खरच काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.