येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २७ तारखेला राज्यसभेतील ५६ खासदार निवृत्त होणार आहेत. तसेच महाराष्ट्रामधून ६ खासदार निवृत्त होणार आहेत. राज्यातील काँग्रेस पक्षाने आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत.
काल अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कदाचित अशोक चव्हाण यांना भाजपा राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाने राज्यसभेसाठी आपली यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे नेमकी कोणाकोणाला उमेदवार मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान गेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला होता. मात्र यंदा पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला दिसून येत आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ६ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री.व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. सध्या भाजपमधील राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना पक्ष पुन्हा संधी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळणार की नाही तसेच आताच्या चेहऱ्यानं की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर त्या गटातील आमदार कोणाला मतदान करणार हा मोठा चर्चेचा विषय आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही २७ फेब्रुवारीपर्यंत सुरु असणार आहे. तसेच यंदा राज्यसभेतून सर्वाधिक खासदार निवृत्त होणार आहे. त्यात सर्वात जास्त निवृत्त होणाऱ्या खासदारांची संख्या ही भाजपाच्या खासदारांचीच आहे. काही राज्यांमधील खासदारांचा कार्यकाळ हा २ आणि ३ एप्रिल २०२४ रोजी संपणार आहे.