सुषमा स्वराज यांचा आज जन्मदिन. हरियाणातील अंबाला येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरूवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्या एक एक प्रगतीची पायरी चढत देशाच्या परराष्ट्र मंत्री झाल्या. सुषमा स्वराज या देशवासीयांच्या सर्वात लाडक्या आणि आवडत्या परराष्ट्र मंत्री होत्या. ज्या कायमच सर्वांशी हसतमुख राहून संवाद साधायच्या. कोणी भारतीय परदेशात संकटात असेल तर त्याच्या मदतीसाठी सुषमा स्वराज कायमच अग्रेसर असायच्या.
८० च्या दशकात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर सुषमा स्वराज या भाजपात सामील झाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज या प्रसारण मंत्री होत्या. त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला होता. सुषमा स्वराज यांनी राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतली असून त्यांनी कायद्याची पदवी देखील प्राप्त केली आहे. सुषमा स्वराज या सुप्रीम कोर्टात वकिली करत असत.
सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या पहिल्या महिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या बदल्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका सांभाळली. २०१४ पर्यन्त त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर सुषमा स्वराज या पूर्णवेळ परराष्ट्र मंत्री राहिल्या. कुशल प्रशंसक, उत्कृष्ट संसदपटू, ओजस्वी नेतृत्व , अमोघ वाणी अशी त्यांची ओळख होती. संसदेतील अनेक भाषणे त्यांनी गाजवली आहेत.
सुषमा स्वराज यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. राजकारणाशिवाय सुषमा स्वराज यांना संगीत, साहित्य आणि कला या विषयांमध्ये आवड होती. १९७० मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वयाच्या २५ व्या वर्षी सर्वात तरुण खासदार म्हणून त्या निवडून आल्या होत्या. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी अनेक भारतीय नागरिकांना संकटातून सोडवून मायदेशी परत आणले आहे. एक चांगल्या परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र धोरण जगभरात पोहोचविणाऱ्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख आहे. २०१५ आणि २०१८ मधील त्यांच संयुक्त राष्ट्र परिषदेतील भाषण चांगलेच गाजले होते. पाकिस्तानवर देखील त्यांनी सडकून टीका केली होती.
दरम्यान ६ ऑगस्ट २०१९ रोजी या कुशल नेतृत्वाची प्राणज्योत मावळली. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देश दुःखात बुडाला होता. त्यांच्या जाण्याने भारताच्या सुसंस्कृत राजकारणाचा एक अध्याय संपला.