मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावली आहे. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. नाकातून रक्तस्त्राव होत असताना देखील मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना अनेकजण उपोषण मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. राणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी एक ट्विट केले आहे. “मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली. त्यांनी आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखवा! तुम्हाला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत!”, अशी खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1757659578827718743
नारायण राणेंनी हे ट्विट करताच मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे.