देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले असून, त्यांनी ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. तर एनडीएने अब कि बार ४०० पार ची घोषणा दिली आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीचे मंथन सुरु केले आहे. दरम्यान, १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये देशभरातील प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत तसेच विजयाचा मंत्र देखील देणार आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार, विधानसभा, विधानपरिषद आमदार, माजी खासदार या सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे. पक्षातील राष्ट्रीय पदावरील सर्वच नेते यात सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय परिषदेसाठी दिल्लीतील भाजपाचे मुख्यालय सजवण्यात येत आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड देखील मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपा मुख्यालयात तेजस विमान आणि वायुसेनेच्या पोशाख परिधान केलेला नरेंद्र मोदींचा कटआऊट लावण्यात आले आहे. अन्य ठिकाणी देखील राम मंदिर, करोना लसीकरण, जनधन अकाउंट आणि इतर महत्वाच्या निर्णयाची माहिती देणारी कटआउट्स लावण्यात येणार आहेत. या अधिवेशनात पाच हजारांपेक्षा जास्त नेते सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण भागातील महत्वाच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील सर्व स्तरांतील, सर्व विभागांमधील
प्रमुख नेते यात सहभागी होणार आहेत.