शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने मंगळवारी सात जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट आणि बल्क मेसेजिंग सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद राहील, असे सरकारने एका आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे, शंभू आणि खनौरी सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने हरियाणाच्या सीमेवरील रुग्णालयांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने हरियाणा सीमेवर रुग्णवाहिकांची संख्या वाढवली असून डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना ड्युटीवर राहण्यास सांगितले आहे. संगरूर, पटियाला, डेरा बस्सी, मानसा आणि भटिंडा येथील रुग्णालयांना सरकारने अलर्ट जारी केला आहे.
कालपासून दोन ते अडीच हजार शेतकरी शंभू सीमेवर उभे आहेत. बॅरिकेडिंग तोडण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीसह बॅरिकेडिंगमध्ये घुसले होते. हरियाणातील शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर आंदोलकांनी दगडफेक केली. तर जींद जिल्ह्यात दोन्ही राज्यांच्या सीमेवर आंदोलकांवर अश्रुधुराचा वापरही करण्यात आला. हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकडीने शंभू सीमेवर सुमारे 18 शेतकरी आंदोलकांना अटक केली आहे.