भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाने देखील राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिलिंद देवरा हे उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आता शिवसेनेकडून देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मिलिंद देवरा हे काँग्रेसकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत 2004 आणि 2009 साली सलग दोन वेळा विजयी झाले होते. तर 2019 मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याकडून देवरांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. पण ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये असल्याने ही जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याने देवरांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा होती. अशातच आता देवरांना शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत न उतरवता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यसभेसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. एकूण 56 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाने पुण्याच्या कोथरूडमधील माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.