भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेले नेते अशोक चव्हाण, तसेच भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तसेच अजित माधवराव गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.
मूळचे नांदेडचे असणाऱ्या बालरोगतज्ञ असणाऱ्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत.
भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे कदाचित त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भाजप नेते विनोद तावडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही.
मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. आपलं तिकीट कापण्यात आल्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या.त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उमेदवाराचे अद्याप नाव पुढे आलेले नाही. .