१४ फेब्रुवारी हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी दिवस आहे. आजच्याच दिवशी ५ वर्षांपूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर पुलवामा इथं भ्याड हल्ला केला आणि त्यात ४० भारतीय जवानांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला भारत कधीही विसरू शकत नाही, आणि या चुकीसाठी पाकिस्तानला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच भारतामध्ये हा एक काळा दिवस म्हणून पाळला जातो.
आत्मघातकी हल्ल्यामुळे झालेल्या प्रचंड स्फोटाच्या काळ्या धुराने पुलवामाचे आकाश व्यापलं होतं. ४० सैनिकांचे छिन्न-विच्छिन्न झालेले अवशेष आजूबाजूला विखुरलेले होते. सैनिकांच्या जळत्या मांसाचा वास हवेत पसरला होता. संपूर्ण देशात स्मशान-शांतता पसरली होती. यथावकाश जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली काश्मीर खोऱ्यात गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला, जो देशाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जाणार होता. आज ५ वर्षांनंतरही ते विनाशाचे दृश्य कोणीही विसरू शकत नाही, जे पाहून संपूर्ण देश रडला होता.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा बसमधून जात होता. हा ताफा पुलवामा येथे आल्यावर रस्त्याच्या बाजूने स्फोटकांनी भरलेली एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या एका गाडीवर दहशतवाद्यांनी धडकवली.या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वकास याने सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केला होता.
सदैव प्रेम आणि बंधुतेचा संदेश देणारा भारत मात्र या घटनेनंतर गप्प बसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशवासियांना संबोधित करताना सांगितले की आपल्या जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल या घटनेनंतर अवघ्या १२ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. २६ फेब्रुवारीच्या रात्री ३ वाजता ४० जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यात आला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. भारतीय लष्कराची १२ मिराज आणि २०० लढाऊ विमाने LOC ओलांडून पाकिस्तानात घुसली. गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढलेले जैश-ए-मोहम्मदचे सर्व तळ बालाकोटमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. ४० जवानांच्या नाहक झालेल्या मृत्यूच्या बदल्यात साडेतीनशेहून अधिक अतिरेकी ठार झाले.
त्यानंतर भारतीय हवाई दलाने एकामागून एक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. शत्रूच्या घरात घुसून मारणारा नवा भारत जगानेही पहिल्यांदाच पाहिला होता. बालाकोट हल्ल्यापासून सुरुवात करून भारतीय लष्कराने एकामागून एक अनेक सर्जिकल स्ट्राईक केले. या घटनेनंतर, भारतीय लष्कराने मोठ्या परिश्रमाने विविध पावले उचलली आणि असे म्हणता येईल की या घटनेला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारने बालाकोट हल्ल्यापासून सर्जिकल स्ट्राईक मोहिमा हाती घेतल्या. इतकेच नाही तर काश्मीरमधील गुलमर्गसह सीमावर्ती भागात शेकडो बंकर तयार करण्यात आले. हे बंकर केवळ गोळ्याच नव्हे तर तोफखानाच्या हल्ल्यांनाही तोंड देऊ शकतात.
गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कर भारताच्या सीमावर्ती भागात अधिक सतर्क झाले आहे. मोदी सरकार काश्मीरशी निगडित विविध मुद्द्यांना हाताशी धरून त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे काश्मीर आणि सीमाभागातील अनेक समस्या कमी झाल्या आहेत.
१४ फेब्रुवारी हा दिवस यासाठी लक्षात राहायला हवा. प्रत्येक भारतीयाने आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचं स्मरण करायला हवं. ५ वर्षांपूर्वी झालेल्या हुतात्म्यांचे बलिदान विसरता कामा नये. ऋतम् एप तर्फे पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली.