सध्या बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आली. मलायकाने एका प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे सहन करण्यापलीकडचे आहे, असे म्हणत मलायकाने मु्ख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.
ठाण्यातील एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये एका श्वानाला तेथील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ठाण्यातील आर.मॉलजवळ असलेल्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मलायकाने यावर संताप व्यक्त केला आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीमध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, हे सर्व सहन करण्यापलीकडे आहे. प्रशासनाने मारहाण करणाऱ्यांवर आणि संबंधित क्लिनिकवर कडक कारवाई करावी.
पुढे मलायकाने संबंधित क्लिनिकचा देखील फोटो पोस्ट केला आहे. तुम्हा सर्वांना अशा पद्धतीच्या वागणुकीबद्दल स्पष्टीकरण द्यावेच लागेल. त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आम्हाला हवे आहे. तो असं करूत कसं शकतो? असा सवाल मलायकाने उपस्थित केला आहे.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी श्वानाला मारहाण केलेल्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्याचाही व्हिडीओ मलायकाने शेअर करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, श्वानाला मारहाण केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मलायकासह अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जुई गडकरी यांनीही संताप व्यक्त केला आहे.