पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय युएई आणि कतार दौऱ्यावर आहेत. आज अबूधाबीमध्ये त्यांच्या हस्ते भव्य हिंदू मंदिराचे उदघाटन देखील केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे जागतिक गव्हर्नमेंट शिखर परिषदेत संबोधन करत होते. यावेळी त्यांनी सर्वसमावेशकतेचे महत्त्व अधोरेखित करून देशांना जागतिक निर्णय प्रक्रियेत ग्लोबल साउथचा आवाज आणि प्राधान्यक्रम वाढविण्याचे आवाहन केले. तसेच विकसनशील जगाच्या चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
”आज जेव्हा आम्ही आमच्या देशामध्ये कायापालट करत आहोत. तेव्हा काय जागतिक प्रशासन संस्थांमध्येही सुधारणा व्हायला नकोत का? आम्हाला विकसनशील देशांच्या चिंता आणि जागतिक निर्णय प्रक्रियेत ग्लोबल साउथच्या सहभागाला प्रोत्साहन द्यावे लागेल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच ते म्हणाले, राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य देणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची प्रतिष्ठाही राखणे महत्त्वाचे आहे.
”आम्हाला ग्लोबल साऊथचा आवाज ऐकावा लागेल. आम्हाला त्यांचे प्राधान्यक्रम पुढे आणावे लागतील, गरजू लोकांना मदत करावी लागेल. सुधारणा आणून राष्ट्रे केवळ आव्हानांचा सामना करू शकत नाहीत तर जागतिक बंध वाढवण्यास आणि सहकार्य करण्यास शक्तिशाली होतील असेही ते म्हणाले. “आम्हाला एआय– आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिप्टोकरन्सी, आणि सायबर क्राइम सारख्या उदयोन्मुख आव्हानांसाठी जागतिक नमुना तयार करावा लागेल. आम्हाला आमच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य द्यावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची प्रतिष्ठा देखील राखावी लागेल,” ते पुढे म्हणाले.