मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील, तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
आंबेडकर पुढे म्हणाले की, जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय. ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालन्यामधून अपक्ष निवडणूक लढवा. एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी आमचा पाठिंबा असेल. ओबीसींच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्यावं लागेल. हे फसवं राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे की, त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिनाभरात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.
ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे, असे आम्ही मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.