मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारल इशारा दिला आहे.
जर सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन करणार, अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर आम्ही मुंबईत पुन्हा आंदोलन करणार. सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी करून घेणार आणि तसे झाले नाही तर उपोषण करत मुंबईत घुसणार, असा थेट इशारा जरांगेनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावली आहे. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. नाकातून रक्तस्त्राव होत असताना देखील मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.