राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज ही घोषणा केली. येत्या २७ तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे आज अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर प्रफुल पटेल बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ”पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी अजित दादा आणि सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या जागेवर कोणाला दुसऱ्याला संधी मिळेल. आज निकाल येणार आहे, त्याची वाट बघू, संध्याकाळी निकाल येणार आहे. मात्र निकाल आमच्या बाजूने लागावा अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो.”
दरम्यान, महायुतीने आपल्या राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना आपले उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान भाजपाने चौथा उमेदवार दिल्यास राज्यसभेची निवडणूक रंगतदार होऊ शकते, अन्यथा यंदाची राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.