आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनासाठी राजधानी दिल्लीकडे निघाले आहेत. दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच हा शेतकरी मोर्चा दिल्लीत आल्यास जनजीवन विस्कळीत होईल, ते होऊ नये यासाठी त्यांना दिल्लीबाहेरच रोखावे अशी मागणी करणारी याचिका देखील न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. शंभू सीमेवर झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती तणावाची आहे.
आज केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बैठक होईपर्यंत पुढे न जाण्याचा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंदीगडमध्ये केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत तोडग निघण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सात दिवसांमध्ये होणारी ही तिसरी बैठक आहे.
शंभू सीमेवर शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हरियाणा पोलिस शेतकऱ्यांवर नजर ठेवून आहेत आणि ड्रोनद्वारे त्यांच्या संख्येचा अंदाज घेत आहेत. वेळोवेळी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. आजूबाजूला धूर झाला असून आंदोलकांनी दगडफेकही केली.तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर उड्डाणपुलावरील सुरक्षा अडथळे तोडले आहेत. सध्या हजारो आंदोलक शंभू सीमेवर उपस्थित आहेत. तसेच शंभू सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधून सिमेंटचे बॅरिकेड जबरदस्तीने हटवले आहेत.