बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा इंडीया आघाडीला रामराम करत ते भाजपसोबत गेले आहेत. नितीश कुमार हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अशातच आता नितीश कुमार यांना एक धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपपासून वेगळे व्हा अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी नितीश कुमार यांना देण्यात आली आहे. हा धमकीचा मेसेज बिहारचे पोलीस महासंचालक यांना आला आहे.
30 जानेवारी रोजी बिहारचे पोलीस महासंचालक आरएस भट्टी यांच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आणि ऑडिओ क्लिप आली होती. या मेसेजमध्ये म्हटले होते की, जर मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपपासून वेगळे झाले नाहीत तर इतर आमदारांसोबत त्यांना बॉम्बने उडवून देऊ, जसे उत्तर प्रदेशात झाले होते.
हा धक्कादायक मेसेज आल्यानंतर पोलीस महासंचालकांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान त्यांना आरोपीचे लोकेशन कर्नाटकातील देवनगिरी जिल्ह्यात असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांची टीम तेथे पोहोचली आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. सोनू हे आरोपीचे नाव असून तो पोती शिवायचे काम करतो.
दरम्यान, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. तसेच आता पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.