काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे भाजपासह सत्तेत आले आणि मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली. अजित पवार हे आपल्या सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार गटामध्ये व अजित पवार गटामध्ये पक्ष व चिन्ह यावरून व आमदार अपात्रता प्रकरणावरून कांद्यायची लढाई सुरु होती. अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार आहेत. यावर नार्वेकर कोणता निर्णय देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधिमंडळ पक्ष कोणता हे ठरल्यानंतरच कोणाचे आमदार पात्र आणि अपात्र हे निश्चित करता येणार आहे. शरद पवार गटाने व अजित पवार गटाने एकमेकांचे आमदार अपात्र करावेत अशी मागणी केली आहे. त्यातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे या निर्णयाचा विचार करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या ४१ तर शरद पवार गटाकडे सध्या १४ आमदारांचे पाठबळ आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज संध्याकाळी ४.३० वाजता निकाल वाचनाला सुरूवात करणार आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मागच्या प्रमाणे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरणार की वेगळा निर्णय येणार हे आज संध्याकाळीच समजणार आहे.