आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे. आज त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत, तरीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. एकिकडे मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असतानाच दुसरीकडे शिंदे गटातील नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.
सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. तर त्यांच्या या मागणीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मनात आले म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही. त्यासाठी एक प्रोसेस असते, मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते. त्यामुळे 20 तारखेला अधिवेशन होणार आहे.
मनोज जरांगेंनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावे. मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे की मराठा समाजाला टिकणारे आंदोलन देणार आहे. तसेच नारायण राणे जे मनोज जरांगेंबाबत बोलले आहेत ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, काल मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तरीही त्यांनी उपचार घेण्याय नकार दिला होता. तर आज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली असून त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे.