दिल्ली हि देशाची राजधानी आहे. या ठिकाणी पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, दूतावास , सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि अनेक मंत्र्यांचे, सचिवांचे निवासस्थान आहेत. संपूर्ण देशाचा कारभार या ठिकाणावरून चालतो. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयातील रजिस्ट्रारला बॉम्ब हल्ल्याची धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली. असा ईमेल प्राप्त होताच दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयातील रजिस्ट्रारला बॉम्ब हल्ल्याच्या धमकीचा ईमेल आला. तसेच या मेलमध्ये हा सर्वात मोठा बॉम्ब हल्ला असेल असे लिहिण्यात आले होते. दिल्ली उच्च नायालयात रजिस्ट्रारला आलेल्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले की, ”मी तुम्हाला १५ फेब्रुवारीला बॉम्बने उडवून देईन. हा स्फोट दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असेल. जेवढी शक्य आहे तेवढी सुरक्षा तैनात करा आणि सर्व मंत्र्यांना बोलवा आणि आम्ही तुम्हाला एकत्रितपणे उडवून देऊ.”
त्याच दिवशी, बिहारच्या डीजीपीला व्हॉट्सॲप संदेश आणि ऑडिओ क्लिपद्वारे बॉम्बची धमकी देणारा कॉल देखील आला होता. या प्रकरणातील आरोपींना कर्नाटकातून अटक करण्यात आली असून, त्यांना पाटण्यात आणण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आलेला बॉम्ब हल्ल्याच्या धमकीप्रकरणी महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली असून याची चौकशी केली जात आहे.