आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनासाठी राजधानी दिल्लीकडे निघाले आहेत. दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच हा शेतकरी मोर्चा दिल्लीत आल्यास जनजीवन विस्कळीत होईल, ते होऊ नये यासाठी त्यांना दिल्लीबाहेरच रोखावे अशी मागणी करणारी याचिका देखील न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. शंभू सीमेवर झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती तणावाची आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात माओवादी सक्रिय झाले असल्याची अत्यंत महत्वाची बातमी माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पक्षाने सरकारला दिली आहे. माओवाद्यांमुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी आता सरकारला घ्यावी लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या आंदोलनात दर्शपाल सिंग हे किसान मोर्चाचे नेते होते. तो आधी माओवाद्यांच्या कार्यकारिणीमध्ये सहभागी होता. त्यानंतर सीपीआय माओवाद्यांच्या सेन्ट्रल कमिटीने त्यांना निलंबित केले आहे. याने मागच्या वेळेस शेतकरी मोर्चाचे नेतृत्व केल्याचे समोर आले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याची माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकांचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे.
पंजाब-हरियाणामध्ये माओवाद्यांचे चांगले फ्रंटल नेटवर्क आहे. देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी सरकारला बदनाम करायचे, आंदोलन पेटवून हिंसाचार घडवून आणायचा असा माओवाद्यांचा प्लॅन असल्याचे समोर येत आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात सरकारविरोधी आंदोलने होत असल्यास तर माओवाद्यांचा हात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागणार नाही किंवा यामुळे हिंसाचार घडणार नाही याची काळजी आता सुरक्षा दलांना तसेच केंद्र सरकारला घ्यावी लागणार आहे.