गीता आणि पत्रकारिता विषयावरील परिसंवादात प्रतिपादन
आपल्या देशाची, समाजाची वीण एका समान संस्कृतीने बांधली गेली आहे. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतानाच राष्ट्राची, समाजाची वीण अधिक घट्ट होईल, असे वार्ताकन करण्याची गरज माध्यमांनी लक्षात घ्यावी आणि तसे वार्ताकन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज येथे केले.
गीता धर्म मंडळ, विश्वसंवाद केंद्र आणि एकता मासिक फाऊंडेशनने श्रीमद भगवदगीता आणि पत्रकारिता या विषयावर आयोजिलेल्या परिसंवादात डॉ. वैद्य बोलत होते. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, सकाळ माध्यम समुहाचे संपादक सम्राट फडणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. विश्राम ढोले, विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एकतेतील विविधता हे भारतीय सस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. विविध विचारप्रवाहांचे या संस्कृतीने स्वागत केले असून, त्यांचा स्वीकारही केला आहे. संस्कृत किंवा अन्य भारतीय भाषांत एक्स्लुजन असा शब्दच नाही. असा विचारांवर येथील समाजाची आणि राष्ट्राची उभारणी झाली आहे. ही बाब लक्षात घेता समाजातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवताना, त्याचे वार्तांकन करताना भडकावू भाषेचा वापर करणे माध्यमांनी टाळावे. राष्ट्राची, समाजाची वीण घट्ट होईल, यादष्टीने वार्ताकन करणे गरजेचे असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
गीता धर्म हा राष्ट्रधर्म आहे. तो संस्कृतीचा धर्म आहे. गीता धर्म कोणत्याही उपासना पद्धतींच्या विरोधात नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या अभ्युदयाचा हा मार्ग आहे. अलीकडच्या काळात देशीवादावर बोलले जाते. तथापि, गीतेच्या अठराव्या अध्यायातच या देशीवादावर भाष्य दिसून येते. राष्ट्रधर्मासाठी भूमिप्रियता व संस्कृतीप्रियता लागते. हाच देशीवाद आहे. सध्याच्या आधुनिक युगात उत्तम नागरिक घडवण्यासाठी गीतेतील ही तत्वे उपयुक्त आहेत, असे डॉ. दातार यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले.
गीता आणि आजची पत्रकारिता यात काही एक साम्य आहे. गोतेचा पॉर्म हा संवादरुपी आहे आणि त्यात निष्पक्षता हे प्रधान सूत्र दिसते. पत्रकारितेत हीच निष्पक्षता अपेक्षित असते, समोर घडणारी घटना संजयाने साक्षी भावाने मांडली. तसेच काम पत्रकारांनी करणे अपेक्षित आहे. तसेच, हे करत असताना आपली स्वच्छ भूमिका मांडणेही गरजेचे आहे. वार्ताकनाच्या जागी वार्ताकन आणि मत मांडण्याच्या वेळी स्वच्छपणे भूमिका घेणे ही पत्रकारांची लक्षणे असली पाहिजेत. या दोन्हींची सरमिसळ करू नये. योग्य आणि अर्तपूर्ण शब्दांची योजना हे गीतेचे ठळक वैशिष्टय आहे. कमी शब्दांत फार मोठा आशय गीता सांगते. पत्रकारांनाही हे तत्व लागू पडते. त्यामुळे या दृष्टीनेही माध्यम विश्वाने गीतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे डॉ. ढोले यांनी सांगितले.
प्रभावी संवाद म्हणजे काय, याचे उत्तम दर्शन गीतेतून घडते. भाषा कशी असावी, शब्दांचा वापर चपखलपणे कसा करावा, याचेही उत्तम मार्गदर्शन गीतेतून मिळते. तसेच, एखादी बातमी किंवा लेखाची मांडणी अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी योग्य शब्दांचा, फॉर्मचा वापर कसा करता येवू शकतो, हेही गीतेच्या अभ्यासातून समजून येते, असे फडणीस यांनी सांगितले. डॉ. तांबट यांनी मनोगत व्यक्त केले. एकता मासिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले. गीता धर्म मंडळाच्या विश्वस्त विनया मेहेंदळे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. विश्वसंवाद केंद्राचे माजी अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. नयना कासखेडीकर यांनी सूत्रसंचालन केले