मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तसेच कालपासून मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे. काल त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तर आज त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत. तरीही मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरांगेंची प्रकृती आणखी नाजूक होत चालली आहे. याप्रकरणी आता मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी जरांगेंना उपचार घेण्यास अडचण काय आहे? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे.
मनोज जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, त्यांच्या उपचारासाठी दोन डॉक्टर तिथे आहेत. तसेच बुधवारी जरांगेंनी दोन सलाईनच्या माध्यमातून फ्लुईड घेतले होते.
यावर हायकोर्टाने म्हटले की, त्याठिकाणी डॉक्टर असणे म्हणजे उपचार घेणे असे होत नाही. जरांगेंना उपचार घ्यायला सांगा, पण रक्ततपासणी ही त्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.
तसेच तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेत आहे. त्याला तुमचा विरोध का? अशी विचारणा कोर्टाने मनोज जरांगेंना केली आहे. तसेच सलाईन लावणे म्हणजे उपचार नव्हे. त्यांनी उपचार घ्यायला पाहिजेत, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली आहे.