राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी एकूण पाच याचिकांवर निकाल दिला आहे. या प्रकरणामध्ये आपण दोन स्वतंत्र निकाल देणार, असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. आपण राष्ट्रवादी पक्ष कुणाचा या मुद्द्यावर पहिला निकाल देणार असून त्यांनतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार असल्याचे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.
मुळ पक्ष कुणाचा हे ठरवल्यानंतरच आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय देणार, असे राहुल नार्वेकरांनी निकालाचे वाचन करताना सांगितले. यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले की, मी संख्याबळाच्या आधारावर निकाल देणार आहे. जर संख्याबळ पाहिले तर अजित पवार यांच्या गटाकडे जास्त संख्याबळ आहे. तसेच पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही.
पक्षावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. पण पक्ष कोणाचा हे पक्षाते संविधान, विधिमंडळातील संख्याबळ यावर ठरवले जाते. राष्ट्रवादीची घटना सर्वात महत्त्वाची आहे. त्याला दोन्ही गट बांधिल आहेत. राष्ट्रवादीमध्ये 30 जून 2023 ला फूट पडली होती. तर नेतृत्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.