राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा मोठा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे असल्याचा निर्णय दिला होता. तर आता राष्ट्रवादी अजित पवारांची यावर राहुल नार्वेकरांनी शिक्कामोर्तब केले आहे.
निकाल देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 30 जून 2023 रोजी दोन गट पडले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. दोन्ही गटांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. तसेच 30 जून रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानले होते. हा निकाल देताना संख्याबळ लक्षात घेतले आहे. तसेच सचिवालयातील कागपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागला. अजित पवारांकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. हे बहुमत शरद पवार गटाकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत असणारे सर्व आमदार पात्र ठरतील, असा निर्णय नार्वेकरांनी दिला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.