विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. यामुळे हा निर्णय शरद पवार गटाला धक्का मानला जात आहे. तसेच राहुल नार्वेकरांनी अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. हा निर्णय देताना त्यांनी संख्याबळ लक्षात घेतले आहे. तसेच सचिवालयातील कागपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देताना नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षीय रचना, संख्याबळ यांचा विचार निर्णय देताना करण्यात आला आहे. ३० जून २०२३ ला पक्षात फूट पडली. यावेळेस पक्षाची घटना काय सांगते हे महत्वाचे आहे. तर दोन्ही गटांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे असे होत नाही. त्यामुळे या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षाचे रचना, संख्याबळ आणि नेतृत्व रचना हे पाहून पक्ष कोणाचा आहे हे ठरवावे लागेल असे नार्वेकर म्हणाले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागला. अजित पवारांकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. हे बहुमत शरद पवार गटाकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत असणारे सर्व आमदार पात्र ठरतील, असा निर्णय नार्वेकरांनी दिला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.