15 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचाच असल्याचे सांगितले. या निकालानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामध्ये आता सुप्रिया सुळेंनी नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर भाष्य केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे असून याच मतदारसंघातून अजित पवारांनी आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही. ही माझी वैचारिक लढाई आहे. लोकशाहीत ही लढाई केली पाहिजे, यात गैर काय आहे? असा सवाल त्यांनी केला.
पुढे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तुमचे घर हे वडिलांच्या नावावर असते. तरीही तुम्ही तुमच्या वडिलांना घराबाहेर काढणार का? आम्ही मर्यादा पुरूषोत्तम रामाचे संस्कार घेऊन पुढे चाललो आहोत. श्रीरामांनी वडिलांसाठी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. तसेच ज्येष्ठांचा सन्मान करणे हे संस्कार आमच्यावर झाले आहेत. रामाच्या मंदिरातच माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवार गट बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दावा सांगणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, हक्क दाखवण्याचा माझा स्वभाव नाहीये. हक्क दाखवण्यामध्ये काय मजा आहे. त्यापेक्षा लोकांचे प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते.