राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली. तब्बल ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीनं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे. २०१९ मध्ये पाटील यांची राष्ट्रीय साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती.
नुकत्याच राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत हर्षवर्धन पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे. देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येते.
याआधी देशातील सहकार आणि साखर क्षेत्रांवर शरद पवारांचे वर्चस्व होते. मात्र आता ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला गेल्या काही दिवसांत भाजपाकडून दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळं महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.