आज बारामतीत अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. काहीजण भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील, पण भावनेने काम होत नाही, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संसदेमध्ये भाषण करून प्रश्न सुटत नाही. तसेच उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळाला म्हणजे काम झाले असे होत नाही, त्यासाठी तडफ असावी लागते, असा खोचक टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला.
पुढे ते म्हणाले, बारामतीत मी आणि माझा परिवार सोडला तर सर्वजण माझ्या विरोधात प्रचार करतील. काहीजण मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करतील. जरी घरातले सर्व माझ्या विरोधात गेले तरी तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात. मला तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. जोपर्यंत तुमची एकजूट आहे तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे.
तुमच्यासमोर काहीजण भावनिक होऊन येतील. पण, भावनेने काम होत नाही किंवा कोणताही प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही, त्यासाठी एक तडफ लागते, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
काही दिवसांतच लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. तसेच दोन मार्च रोजी पाच जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा होणार आहे. त्यातून आपल्या परिसरातील जास्तीत जास्त तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे. तसेच आपले घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे. आपल्यासोबत भाजप आणि शिवसेना आहे, असेही अजित पवार म्हणाले.