आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. युवक काँग्रेसची देखील खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आता पगार देण्यासाठी व बिले भरण्यासाठी पैसे नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी सांगितले आहे. अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. पक्षाची काठी गोठवणे म्हणजे लोकशाहीची गोठवणूक असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत माकन म्हणाले, ”तुम्हाला सांगण्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.”
पत्रकार परिषदेत बोलताना माकन म्हणाले, ”आम्हाला काल माहिती मिळाली आहे की, बँक आम्ही दिलेल्या चेकचा स्वीकार करत नाहीये. त्यापुढे चौकशी केली असता आमहाला कळले की, युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाची खाती देखील गोठवण्यात आली आहेत. आयकर विभागाने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षाची खाती गोठवली जातात, हे म्हणजे लोकशाही गोठविण्यासारखे आहे.” निवडणुकीआधी खाती गोठवण्यामागचा नक्की हेतू काय आहे? हा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला.
“राष्ट्रीय निवडणुकांच्या घोषणेच्या दोन आठवड्यांपूर्वीच प्रमुख विरोधी पक्षांची खाती गोठवली गेली आहेत. आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे असे तुम्हाला वाटते का?” माकन यांनी प्रश्न उपस्थित केला. ”आता आमच्याकडे पैसे नाहीत, लोकांचे पगार करण्यासाठी देखील पैसे नाहीत. याचा परिणाम भारत जोडो न्याय यात्रेवर देखील होणार आहे. आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे असे तुम्हाला वाटते का?” असे माकन म्हणाले.
सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधींची यात्रा आज बिहारमध्ये दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्यात ही यात्रा बिहारमधून उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. मणिपूरपासून सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून जाणार आहे.