स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतामध्ये चित्रपट निर्मितीचा पसारा खूप मोठा आहे. दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या इंडस्ट्रीच्या निर्मितीचं श्रेय आहे एका मराठी माणसाचं. ते म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
राजा हरिश्चंद्र हा चित्रपट हरिश्चंद्र राजाच्या पौराणिक कथेवर आधारित होता. एक पौराणिक कथा ज्याचं कथानक सर्वाना माहिती आहे, अशा विषयावर एका मूकपटाची निर्मिती करण्याचा विचार करण्याचे धैर्य आणि हिम्मत दादासाहेबांनी दाखवली आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले. यामध्ये त्यांना त्यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी मोलाची साथ दिली. चित्रपटाच्या निर्मिती खर्चासाठी त्यांनी दागिने विकले. इतकंच नाही तर, तांत्रिक गोष्टींची माहिती करून घेतली, चित्रपट निर्मितीसाठी काम करणाऱ्या ६०-७० कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करून त्यांच्या स्वयंपाकाचीही जबाबदारी घेतली, अगदी प्रसंगी त्यांचे कपडेही धुतले. दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली नाशिक येथे झाला. एका संस्कृत पंडितांच्या घरात जन्माला आलेल्या दादासाहेबांना आवड होती ती कलात्मक दुनियेची. जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून त्यांनी पदवीही घेतली होती. सतत काहीतरी नवीन करण्याची उमेद त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नव्हती.
सुरुवातीला त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला होता. परंतु, त्यांच्या सरळमार्गी आयुष्यामध्ये प्लेगच्या साथीचे वादळ आले. प्लेगच्या साथीत प्रथम पत्नी आणि मूल दगवल्यावर एकाकी पडलेल्या दादासाहेबांनी गोध्रा सोडले. कालांतराने जर्मनीच्या कार्ल हर्ट्झ या जादूगाराबरोबर झालेला परिचय त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेले. दादासाहेब ‘प्रोफेसर केळफा’ या नावाने जादूचे प्रयोग करून दाखवत असत.
१९११ मध्ये आलेल्या ‘लाईफ ऑफ ख्राईस्ट’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन दादासाहेबांनी भारतात चित्रपट बनवण्याचा ठरवलं. त्यासाठी आवश्यक असणारं तांत्रिक ज्ञान घेण्यासाठी ते लंडनला गेले. भारतात परत आल्यावर १ एप्रिल १९१२ रोजी त्यांनी ‘फाळके फिल्म्स’ ची स्थापना केली आणि भारतातील पहिला मुकपट ‘राजा हरिश्चंद्र’ची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. चित्रपट तयार करताना अनंत अडचणी आल्या पण त्यावर दादासाहेबांनी मात केली आणि ५ मे १९१३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. हा मूकपट असल्यामुळे या चित्रपटाला भाषेचे बंधन नव्हते. अर्थात प्रदर्शनाचा हा प्रवासही सोपा नव्हता.
चित्रपटगृहाची व्यवस्था करताना दादासाहेबांसमोर अनेक समस्या आल्या, अनेकांनी त्यांची खिल्लीही उडवली. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी हा चित्रपट निवडक प्रेक्षकांना दाखविण्याचा निर्णय घेतला आणि २१ एप्रिल १९१३ रोजी रात्री ९ वाजता ऑलिंपिया थिएटर, मुंबई येथे ठराविक निमंत्रिकांच्या उपस्थितीत या पहिल्यावहिल्या भारतीय चित्रपटाचा ‘प्रीमियर शो’ दाखविण्यात आला. प्रीमियर शो नंतर सर्वत्र दादासाहेबांचे कौतुक झाले. केसरी, टाइम्स ऑफ इंडिया व इतरही नामांकित वृत्तपत्रामध्ये या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे समीक्षण छापून आले आणि भारतभर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या.
दादासाहेब फाळके यांनी आयुष्यभरात एकूण ९५ चित्रपट व २६ लघु चित्रपटांची निर्मिती केली. ‘गंगावतरण’ हा फाळकेंनी निर्मित केलेला पहिला आणि शेवटचा बोलपट. यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
– ♦️मानसी जोशी ♦️
(लेखिका ब्लॉगर आहेत.)
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे